Wednesday, May 6, 2015

महाराणी अहिल्याबाई होळकर : सर्वजन कल्याणकारी पहिली भारतीय महिला राज्यकर्त्या !

महाराणी अहिल्याबाई होळकर  
सर्वजन कल्याणकारी पहिली भारतीय महिला राज्यकर्त्या ! 

भारतात ख-या अर्थाने समाज सुधारकांची चळवळ इंग्रजांच्‍या राज्यात महात्‍मा फुले यांनी सुरु केली. हाच आदर्श घेवुन छत्रपती शाहू महाराजांनी राजे असुनही समाज सुधारकाचे काम केले. सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्‍वामी, नारायणगुरु, अण्‍णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाज सुधारकाचे काम केले. भारतीय स्‍त्री तर कोणत्‍याही जाती धर्माची असली तरी तिला शुद्र म्‍हणूनचं वागणूक मिळत होती. अशा काळात थोर क्रांतीकारी सामाजिक राज्‍यकर्त्‍या पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर होऊन गेल्‍या. महाराणी अहिल्याबाई होळकर या भारतातील पहिल्या क्रांतीकारी समाजसुधारक महिला राज्यकर्त्या ठरतात. अहिल्‍याबाईचा जन्‍म 31 में 1725 रोजी अहमदनगर जिल्‍ह्यातील चोंडी या गावी झाला. शिवरायांच्या हिंदवी स्‍वराज्‍याचा झेंडा अटकेपार लावणारे आणि मध्‍य प्रदेशात हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करणारे मल्‍हाररावजी होळकर हे अहिल्‍याबाईंचे सासरे होते. त्‍यांनी प्रजेच्‍या हिताचे, सुख शांतीचे राज्य निर्माण केले. राजाचा वारस पुत्र खंडेरावाचा लढाईत मृत्‍यू झाला. रुढी परंपरेने सती जाण्‍याची वेळ अहिल्‍याबाईवर आली. अहिल्‍याबाईला सती न जाऊ देता तिच्या हाती राज्‍यकारभार सोपविण्‍याचे काम मल्‍हाररावांनी केले. अहिल्‍याबाईने सती जाण्‍याचा रुढी रिवाज तोडून, लोक निंदेला न जुमानता, आपण मेलो तर आपल्‍याला सुख मिळेल, परंतु जगलो तर आपल्‍या लाखो प्रजाजनांना सुख मिळेल म्‍हणून सती न जाण्‍याचे ठरवून रूढ़ीग्रस्त धर्माच्‍या विरुध्‍द क्रांतीकारी पहिले बंड केले. भारतीय स्‍त्रीला शिक्षणाचा, राज्‍य करण्‍याचा अधिकार नव्‍हता. त्‍या विरुध्‍द क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्‍याबाईने राज्‍य कारभाराची सूत्रे हाती घेतली. कुटूंबातील सासरा, नवरा, मुलगा या सर्वांच्‍या मृत्‍यूनंतर जनकल्‍याणासाठी मनोधैर्य खचू न देता, धैर्याने अहिल्‍याबाईंनी राज्‍यकारभार संभाळला. त्या जास्‍तीत जास्‍त वेळ समाज कल्‍याणासाठी देत. अहिल्‍याबाईंनी प्रजेला त्रास देणा-यांना पकडून आणून सामोपचाराच्‍या गोष्‍टी सांगून त्‍यांना जगण्‍यासाठी जमिनी देवून चांगल्‍या मार्गाला लावले. त्‍यांचे संसार सुखा समाधानाने फुलविले. प्रजेचा छळ न करता प्रजेला परवडेल एवढाच कर वसूल केला. करापासून वसुल केलेला पैसा लोकांच्‍याच हिताकरिता खर्च केला. धन संपत्‍ती ही व्यक्तिगत मालमत्ता नसुन देवाने आणि जनतेने योग्य रितीने विनियोग करण्याकरिता आपल्‍या स्‍वाधीन केलेला तो एक ठेवा आहे, असे त्‍या समजत. वारस नसेल तर दत्‍तक घेण्‍याचा व स्‍वाभिमानाने जगण्‍याचा अधिकार अहिल्‍याबाईंनी प्रजेला दिला होता. प्रजेचे सुख-दुःख स्‍वतः प्रत्‍यक्ष ऐकून घेऊन भेटण्‍यासाठी प्रजेला वेळ देत आणि स्‍वतः न्‍यायाधिशाप्रमाणे काम करीत. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍यात जातीभेदाला थारा नव्‍हता. त्‍या सर्व प्रजा सारखीच मानीत असत. याचा परिणाम असा होई की विविध राज्‍यातील लोकसुध्‍दा, "आम्‍ही तुमच्‍या राज्‍यात राहायला येतो" असे त्‍यांना म्‍हणत. एकंदरीत अहिल्‍याबाईंची प्रजा संतुष्‍ट व सुखी होती. कारण प्रजेचा संतोष हाच राज्‍याचा पाया आहे, असा अहिल्‍याबाईंचा विचार होता.

प्रजेचा सांभाळ लेकरा प्रमाणे करणे, हा राजधर्म असल्याचे राजमाता अहिल्‍याबाई मानत. राज्‍य कारभारातील कोणत्‍याही अधिका-याने अथवा जवळच्‍या माणसाने प्रजेकडून पैसे उकळले तर अहिल्‍याबाई त्‍याला ताबडतोब शिक्षा करीत आणि त्‍याचे अधिकार काढून घेत. त्यांचा प्रशासनावर वचक होता. सर्व जनतेला न्‍याय मिळावा म्‍हणून न्‍यायालयाची स्‍थापना, गावागावात पंचायतीची स्‍थापना, न्‍याय मिळविण्‍यासाठी आर्जव करण्‍याची व्‍यवस्‍था, प्रत्‍यक्ष राजाला भेटून न्‍याय मिळविण्‍याची व्‍यवस्‍था, पोलीस यंत्रणा, गावोगाव कोतवालाची पदे निर्मती, तसेच कृषी आणि वाणिज्‍य या क्षेत्राच्या उत्‍कर्षावर जास्‍त भर देऊन शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍यात आला होता. प्रजेसाठी, रस्‍ते, पुल, घाट, धर्मशाळा, विहीरी, तलाव बांधले होते. बेरोजगारांना रोजगार मिळण्‍यासाठी रोजगार धंद्याची योजना राबविण्‍यात आली होती. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी वृक्षरोपण केले होते. भाविक गोर-गरीब लोक तीर्थ यात्रेला जात असत व तेथे त्‍यांची गैरसोय होऊ नये म्‍हणून अन्‍नदानाची छत्रे, राहण्‍यासाठी धर्मशाळेची सोय, हे फक्‍त होळकरांच्‍या राज्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण भारतातील इतर राज्‍यात सुध्‍दा प्रत्‍येक तीर्थयात्रेच्‍या ठिकाणी सोयी महाराणी अहिल्‍याबाईंनी उपलब्‍ध केल्या होत्या.

अहिल्‍याबाईंनी शत्रूंचा - बंडवाले समाज कंटकांचा बिमोड करुन त्‍यांचे पुनर्वसन केले आणि राज्‍यात शांतता प्रस्‍थ‍ापित केली. राज्‍य कारभार, समाज व्‍यवस्‍था, कायदे कानून वगैरे बाबत सुधारणा केल्‍या. त्‍यामुळे प्रजा अहिल्‍याबाईंच्‍या सामाजिक, राजकीय कार्यावर संतुष्‍ट होती. अहिल्‍याबाईचे राजकारण एकंदरीत शांततेचे होते. त्‍यामुळे राज्‍यात शांतता व सुबत्‍ता लाभली. याची नोंद पंडीत नेहरुनी देखील घेतली आहे. म्‍हणूनच त्‍यांना शांतताप्रिय राज्यकर्ती, असे म्‍हणतात. 

अहिल्‍याबाईने इ.स. 1765 ते 1795 या प्रदीर्घ कालावधीत राज्‍य केले. 13 ऑगस्‍ट 1795 रोजी लोकमाता अहिल्‍याबाईंचा मृत्‍यू झाला. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍य कारभाराबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल मराठी, उर्दु, इंग्रजी कवी - लेखकांनी फार मोठ्या प्रमाणात साहित्‍य लिहून ठेवलेले आहे. इतर राज्याची तुलना केली तर त्‍या काळात अहिल्‍याबाई फार मोठ्या सामाजिक, क्रांतीकारक राज्‍यकर्त्‍या होऊन गेल्‍या. हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट सत्‍य समोर येते. स्‍वातंत्र्यानंतर 45 वर्षात लोकशाही प्रशासनाच्‍या योजनेत जे अनेक कलमी कार्यक्रम राबविले जात आहेत, ते सर्व लोकमातेच्‍या राज्‍यात राबविण्‍यात आलेले दिसून येते. अहिल्‍याबाईंचा प्रशासनावर फार मोठा वचक असल्‍यामुळेच त्‍या समाजाला न्‍याय देऊ शकल्‍या. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक आघाडीवर महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांनी तब्‍बल 30 वर्षे समर्थपणे राबविलेल्‍या शासन यंत्रणेतून क्रांतीकारक कार्य केले. यातून राजमातेची शक्‍ती आणि युक्‍ती दिसून येते. त्‍या केवळ धनगर समाजाच्‍याच नव्‍हे तर तमाम भारतीय जनतेच्या आदर्श ठरतात. लोकमातेच्‍या धार्मिक, सांस्‍कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि मुख्‍यत्‍व राजकीय प्रेरणा स्‍त्रोतातून किमान एक पैलू घेऊन धनगर तत्सम राष्ट्रीय समाजाने वाटचाल केली असती तर भारत - भारतीय समाज आज एक मागास-दुबळा देश-समाज म्‍हणून ओळखला गेला नसता. सम्राट चंद्रगुप्‍त मौर्यापासून ते होळकरांपर्यंत वैभवशाली व कल्‍याणकारी परंपरा असताना धनगर समाज पर्याप्त शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, राजकीय भागीदारी पासुन वंचीत आहे.

सर्व प्रकारच्या समतेची हमी भारतीय राज्‍य घटनेने भारतीय जनतेला दिली आहे. सर्व समाज घटकांच्‍या सर्वांगिण विकासाला वाव देणा-या विविध तरतूदी आपल्‍या प्रजासत्ताक भारताच्‍या राज्‍य घटनेमध्‍ये अंतर्भूत असतानां भारताच्‍या स्‍वातंत्र्याची 65-67 वर्षे व भारतीय प्रजासत्‍ताकाची 65 वर्षे उलटून जावुनही राष्‍ट्रीय जीवनाच्‍या विविध क्षेत्रातील भागीदारीपासून वंचित का? तर याचे एकमेव कारण म्‍हणजे धनगर समाजाच्‍या हिताची जपणूक करणारा आजवर एकही प्रतिनिधी संसदेमध्‍ये गेला नाही. महाराष्‍ट्रामध्‍ये धनगर समाजाची लोकसंख्‍या 17 टक्‍के असताना सुध्‍दा एकही खासदार आजपर्यंत निवडून का पाठविता आला नाही? याला जबाबदार कोण? धनगर समाजात राजकीय जागृतीचा अभाव, हे प्रमुख कारण असल्याचे मी हेरले. किंबहुना धनगर तत्सम इतर समाजाच्या मागासपणाचे कारणही हेच असल्याचे मी जाणले. मराठा, मातंग, बौध्‍द, लिंगायत, जैन, मुस्‍लीम, ब्राह्मण सर्व समाजात पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवीबद्दल मला आदरभाव आढळला. परंतु, मराठी साहित्‍यात पुण्‍यश्‍लोक कोठे आहे ? ‘हिंदू धर्म आणि संस्‍कृती रक्षिताअहिल्‍यादेवींच्‍या नावाने महाराष्‍ट्रात एकही सांस्‍कृतिक केंद्र का नाही? वृत्‍तपत्रे, दूरदर्शनमध्‍ये पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे दर्शन का नाही? असे प्रश्‍न मला पडतात. केवळ धनगरवाड्यातच अहिल्‍या जयंती वा पुण्‍यतिथी का? असाही प्रश्‍न मला पडतो. तसेच यात हिंदू समाजाचा, मराठी माणसाचा दोष नसून हा "प्रचार-प्रसार" यंत्रणेचा दोष आहे, हेही मी जाणतो. तसेच पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे वारस देखील कमी पडले, असा माझे निरिक्षण आहे. तात्‍पर्य, पुण्‍श्‍लोक असूनही अहिल्‍यादेवी उपेक्षित आहे. तिला उपेक्षित कोणी ठेवले आहे ? त्‍याला जबाबदार कोण आहे ? प्रचार विना सत्‍यही मरते. असेच काही महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या बाबतीत घडले आहे, असे माझे मत आहे.

सुरुवातीला धनगर तत्सम बहुजन समाजाला जागृत आणि संघटित समाज बनवून न्‍याय्य अशी राष्‍ट्रीय भागीदारी प्राप्‍त करण्‍याच्‍या उद्देशाने 1995 साली महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्या या स्म्रुति द्विशताब्धीवर्षी यशवंतसेनेने समर्थ धनगर - बहुजन समाज निर्माण अभियानराबविले. 1997 साली अहिल्‍या प्रेरणा भागीदारी यात्रेचे आयोजन केले. होळकरशाहीचे मूळ गाव "होळ" पासून अहिल्‍या प्रेरणा भागीदारी यात्रेस प्रारंभ करून लोकमाता अहिल्‍याबाई होळकर यांचे जन्‍मगांव मुक्‍काम चौंडी येथे यात्रेचे समापन केले. जागृती आणि जागरुकता ही आजची तलवार मानुन लोकसभा, राज्‍यसभा, विधानसभा, विधान परिषद, मंत्रालय, सचिवालय, ग्रंथालय इत्‍यादि, शासकीय, प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्र हे आधुनिक गड किल्‍ले ताब्‍यात घेतल्‍याशिवाय धनगर समाजाचा - बहुजन राष्‍ट्रीय समाजाचा सर्वांगिण विकास शक्‍य नाही. हे जाणुन सर्वजन उद्धारक, समर्थ राज्‍यकर्त्या, कुशल प्रशासक, वीरांगना महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांची प्रेरणा घेऊन स्‍वमती, स्‍वप्रयत्‍न, स्‍वधन, स्‍वावलंबन यांच्‍या जोरावर धनगर तत्सम राष्‍ट्रीय समाजात जागरण अभियान छेडण्‍याच्‍या उद्देशाने राष्‍ट्रीय समाज पक्षाची स्‍थापना केली.

भिल्‍लांना "भिलकवडी " नावाच्‍या कराद्वारे उत्‍पन्‍न आणि उदरनिर्वाहाचे साधन देणारी, मोफत तसेच तूर्त न्‍याय देणारी, पोष्‍टाची व्‍यवस्‍था करणारी, लिखित साहित्‍य बाळगणारी, औषधाची जाण असणारी, फौजेला वेगवेगळ्या वेळी भरपूर पगार देणारी, हिंदू जैन बौध्‍द सिखांच्या गुरुद्वारा सहित मु‍स्लिमाच्या दर्गा - मस्जिद - पिरांना दानधर्म देणारी एकमेव राज्‍यकर्ती म्‍हणजे महाराणी अहिल्‍याबाई होळकर असल्‍याचे मला जाणवले. छत्रपति शिवरायांचा वारसा ख-या अर्थाने राजमाता अहिल्‍याबाई होळकर यांनी 30 वर्षे सांभाळला. सर्वजन कल्याणकारी राज्यकारभारामुळे प्रजा महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांना अहिल्यादेवीमानु लागली. धर्मशील अहिल्‍यादेवींनी राज्यकारभारासाठी तलवारही पकडली होती. म्हणून इंदुरच्या वाटेला कोणी जात नसत. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचा धार्मिक चेहरा लोकांसमोर आणला गेला होता. परंतु तलवारधारी महाराणी अहिल्‍याबाईंचा राजकर्ता चेहरा लपविला गेल्याचे मी जाणले. 1994 साली तलवारधारी महाराणी अहिल्‍याबाईंचा प्रचार सर्वप्रथम आम्ही सुरु केला. गैरसमजातुन टिका - टवाळी झाली. आम्हीं सहन केली, व जवाबही दिले. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे "सामाजिक आणि राजकीय स्‍वरुपा महाराणी अहिल्‍याबाई होळकर" अशी प्रतिमा प्रकाशित करण्‍याचे आणि तेही ते मोठ्या प्रमाणात प्रसारीत करण्‍याचे कार्य गेली तब्बल २० वर्षे यशवंतसेना आणि राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातुन केले. त्याचा परिणाम म्हणूनच आज धनगर समाजात एक प्रचंड राजकीय आणि सामाजिक जागृतीच्या रूपाने दिसत आहे. याचे मूळ श्रेय मात्र महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या प्रतिभेस आणि प्रतिमेस जाते. 31 में 2003 रोजी महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या जन्‍मगावी त्यांच्या जयंतीदिनी राष्‍ट्रीय समाज पक्षाची स्‍थापना केली. दिल्‍लीचे राज्‍य हे लक्ष्‍य बनविले. तत्‍पूर्वी चोंडी येथे दरवर्षी 31 मे रोजी जनजागरण मेळावे आयोजित केले जातात. यंदाही रासपातर्फ देशातील सर्वात मोठा महाराणी अहिल्‍याबाई होळकर जयंती महोत्सव चोंडी येथे (31 मे रोजी 2015) साजरा होत आहे. महाराणी अहिल्‍याबाई होळकर राजकर्त्या होत्या म्हणुन समाजकारण करु शकल्या. परंतु राजकर्ता धनगर समाज आपला मोठा वारसा विसरला. राजा समाज दुबळा प्रजा समाज बनला. केवळ वोटर समाज बनला. या पार्श्वभुमीवर रासपाच्या माध्यमातुन राजकीय आणि सामाजिक जागृतीचा संदेश महाराष्‍ट्रातील आणि देशातील शक्‍य त्‍याभागात तमाम राष्‍ट्रीय समाजापर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न केला. दिल्ली, गुजरात, मध्‍यप्रदेश, उत्तर प्रदेश, प. बंगाल, कर्नाटक, तमीळनाडू अशा चारी बाजूस संदेश पाठविले. कार्यकर्ते तयार केले, पदाधिकारी नेमले. देशातील सर्वात मोठे सत्ताकेंद्र दिल्लीत - संसद भवन मध्ये आहे. राष्‍ट्रीय समाज पक्षाची स्‍थापना करुन मुंबई - दिल्‍ली लक्ष्‍य बनविले. महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांनी दाखविलेले सर्वजन हिताय - सर्वजन सुखाय हे ध्येय घेवून वाटचाल करणारा राष्‍ट्रीय समाज पक्ष आहे. सिना नदीच्या काठी वसलेल्या सर्वजन कल्याणकारी पहिली भारतीय महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांची जन्मभुमि चोंडी येथे 31 मे 2003 रोजी स्थापित राष्‍ट्रीय समाज पक्षाची गंगोत्री आता कन्‍याकुमारी ते काश्मिर तसेच कच्छ ते बंगाल असा पसरत आहे.
 
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या 290 व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
- आ. महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष

3 comments:

  1. जय मल्हार जय अहिल्या जय भारत

    ReplyDelete