Monday, June 11, 2012

'ओबीसी' चळवळीत काम करणाऱ्या सर्व नेत्यांना महादेव जानकरांनी एकत्र आणले, ही कौतुकाची बाब - मुंडे

ओबीसी एकत्र आले की, कुणाकडेही मागायची गरज नाही !
'
ओबीसी' चळवळीत काम करणाऱ्या सर्व नेत्यांना महादेव जानकरांनी एकत्र आणले, ही कौतुकाची बाब - मुंडे


अहमदनगर / जामखेड - चोंडी , 31 मे 2012 ( प्रतिनिधि )
'ओबीसी' चळवळीत काम करणाऱ्या सर्व नेत्यांना महादेव जानकरांनी एकत्र आणले, ही कौतुकाची बाब आहे. 'ओबीसीं'मधील सर्व घटक एकत्र आले, तर कोणाच्या दारात काही मागायला जावे लागणार नाही. सर्व उघडपणे बोलता येत नाही. भुजबळांची अडचण आहे; मात्र वेळ आल्यास तेही माझ्या पाठीशी उभे राहतील, असे उद्‌गार भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी आज काढले.

चौंडी येथे पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने ' शासक बनो संकल्प रॅली ' आयोजित केली होती. त्यात मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार गणपतराव देशमुख, प्रा. राम शिंदे, पंकजा मुंडे - पालवे व माधुरी मिसाळ, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार गंगाधर पटणे , कामिनी पाटील, व 'अहल्यादेवी' चित्रपटाच्या निर्मात्या पटवर्धन आदींसह कर्नाटक, आंध प्रदेश व राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, ""राजकारणात अनेक पक्ष मोठे होतात; सत्तेत येतात-जातात. मात्र, राजकारणातून समाजासाठी पूर्ण वेळ स्वतःला वाहून घेणारा एखादाच असतो. यापैकी जानकर होत.'' जानकरांना उद्देशून ते म्हणाले, ""पहिली मोटरगाडी तुम्हाला बीड जिल्ह्याने दिली होती. या वेळी नवी दिली. पुढे बीड जिल्हा हेलिकॉप्टर देईल. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश व्हावा, या मागणीसाठी मी तुमच्या बरोबर आहे.''

भुजबळ म्हणाले, ""ओबीसींचे आरक्षण सांभाळताना अडचणी वाढल्या आहेत. काहीही करा; पण "ओबीसी' आरक्षणाचा टक्का घसरू देऊ नका, असे आम्ही बोलतो, त्या वेळी विशिष्ट समाजाच्या विरोधी माझी भूमिका आहे, असे चुकीचे सांगितले जाते. आम्ही बोलतो ते केवळ माळी-वंजारी-धनगर यांच्यासाठी नाही, तर साडेतीनशे जातींसाठी बोलतो. धनगर समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी आपण आग्रही राहावे.''

डांगे म्हणाले, ""धनगर समाजाच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करीत आहेत. शपथ घेतल्यापासून आजपर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाजाच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी वेळ दिली नाही. यावरून ते धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशाला अनुकूल नाहीत, असे दिसते.''

प्रा. शिंदे म्हणाले, ""मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौंडी येथे येऊन विकास प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली. चाळीस कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सरकारकडे सादर असून, केवळ दोन कोटी रुपये मंजूर केले. सभागृहात या विषयावर चर्चा केली असता, त्याकडेही दुर्लक्ष केले.''

आमदार पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, "बाराव्या वर्षी अहल्यादेवींचे जीवनचरित्र वाचले आणि त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर पडल्या. त्या माझ्या श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे येथील भक्तांच्या सर्व विषयांबरोबर आपण आहोत.''

शपथ घेतली , आजवर पाळली !
महादेव जानकर म्हणाले, '' सत्तावीस वर्षांपूर्वी शपथ घेतली, घरी जाणार नाही... लग्न करणार नाही... समाजासाठी स्वतःला वाहून घेईन... त्या पद्धतीने काम सुरू आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य जिल्हा परिषद, पंचायत समितीत निवडून आले. बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. पुढील काळात मुंडे-भुजबळांनी आशीर्वाद दिले, तर सत्ताधाऱ्यांना पायउतार करू.''

( साभार : दै. सकाळ , 01 जून 2012 मधून...)

( http://72.78.249.125/esakal/20120601/5122757276296398795.htm )

कृपया पुढील लिंक पहावे >>>>

No comments:

Post a Comment