Wednesday, April 13, 2011

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...


डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जयंती निमित्त...

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सर्वाना

मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!शाहू-फुले-आंबेडकर - अनुयायी आणि वारसदार

प्रजासत्‍ताक लोकशाही भारताचे प्रमुख शिल्‍पकार बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर म्‍हणतात, "It is not enough to be electors only, it is necessary to be law makers; other-wise who can be law-makers will be Masters of those who can only be electors." केवळ निवडून देणारे (मतदार) होणे पुरेसे नसुन निवडुन जाणारे बनणे आवश्यक आहे. अन्यथा निवडुन जाणारे (कायदे बनविणारे शासक-राज्यकर्ते बनुन) मतदान करणा-यांचे (शासित वर्गाचे) मालक बनून राहतील. भारतीय राज्यघटनेच्‍या मुख्‍य शिल्‍पकारांचे हे बोल भारतातील "शासित आणि शोषित" वर्गाने समजून घेण्‍याची गरज आहे. 1) स्‍टेट / राज्‍यासमोर सर्व समान आहेत. (यात सेक्‍युल्‍यरिजमचे मूळ आहे) 2) धर्म, वंश्‍, जात, लिंग जन्‍मस्‍थान या अथवा यापैकी कोणत्‍याही कारणावरुन भेदभाव न करण्‍याची गरज आहे. भारत स्‍वतंत्र होऊन 63 वर्षे झाली. भारताला "प्रजासत्‍ताक " राज्‍य घोषित करुन 61 वर्षे झाली, परंतु भारतीय जनता, भारतीय मतदार ख-या अर्थाने स्‍वतंत्र झाला नाही. भारत "प्रजासत्‍ताक बनला नाही. भारत महासत्‍ताक बनवण्‍यासाठी अमेरिका आणि चीनबरोबर स्‍पर्धा करीत असल्‍याचे चित्र रंगविले जात आहे. त्‍याच वेळेस भारताच्‍या जनतेची अवस्था "मागास "देशाच्‍या" सारखी झाली आहे. "खाऊजा धोरणामुळे भारतात "अल्‍पसंख्‍य" वर्ग "गब्‍बर" बनत असून "बहुसंख्‍य" वर्ग विषमतेने होरपळून निघत आहे. हा देश पुढारलेला इंडिया आणि मागासलेला भारत असा सरळ सरळ विभागला गेला आहे. याला शासक वर्ग आणि शासित वर्ग अशी मुळातील विभागणी "कारणीभूत" आहे. जातदांडग्‍या "माफीया" च्‍या हाती राज्‍य देऊन मनीवादी आणि मनुवादी यांचे साटेलोटे भारतात शासन करीत आहे. 90 टक्‍के शासित वर्गाकडे ज्‍याला राष्‍ट्रीय समाज असे बलवाचक नाव मी दिले आहे. त्‍याच्‍याकडे वोट पॉवर आहे. परंतु या मतांची लूट करण्‍यात 10 टक्‍के शासक वर्ग आजपर्यंत यशस्‍वी ठरला आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि राष्‍ट्रवादी-सेनेसारखे बगलबच्‍चे पक्ष राष्‍ट्रीय समाजाच्‍या मतशक्‍तीच्‍या आधारावर राज्‍य करीत आहेत. भारतातील डावे उजवे-मधले-विरोधी आदि सर्व पक्ष वेगवेगळे मुखवटे घेऊन राष्‍ट्रीय समाजाची मते मिळवून महाराष्‍ट्र आणि भारतावर राज्‍य करीत आहेत. दुर्दैवाने या षडयंत्राला ब्राह्मणेतर 'फुले-शाहू-आंबेडकरवादी’ पक्ष बळी पडत गेले. तरीही केवळ निवडून देणारे होणे पुरेसे नसुन कायदे बनविणारे (शासक) होण्‍याची आवश्‍यकता आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा हा संदेश विषमतेने ग्रासलेल्‍या 90 टक्‍के मतदार असलेल्या शासित वर्गासाठी सर्वांत मौल्‍यवान आहे, हे ध्यानात घेणे फार महत्वाचे ठरते..

निरक्षर असलेल्‍या कुरमा - धनगर समाजात जन्‍माला आलेले कंचा इल्‍लय्या भारतातील पहिल्‍या तीन सर्वश्रेष्‍ठ इंग्लिश लेखक, विचारवंतामधील एक मानले जातात. जागतिकीकरणाबरोबर येणा-या Cultural Spiritual बदलामुळे दलित-बहुजनांचा फायदा होणार असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. गौतम बुध्‍द, येशू ख्‍्रिस्‍त, मोहम्‍मद पैगंबर, कार्ल मार्क्‍स आणि डॉ.आंबेडकर हे पाच जगातील प्रेषित असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्त केले. कंचा इल्‍लय्यांनी डॉ.आंबेडकर यांना गौतम बुध्‍द या जगातील पहिल्‍या महापुरुषांनतर भारतीतील दुसरा, जगातील पाचवा आणि अखेरचा महापुरुष ठरविले आहे, मानले आहे, डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्‍व आणि नेतृत्‍व किती महान होते हेच यातून प्रत्‍ययाला येते. डॉ.आंबेडकर ज्ञानाचे सागर होतेच, त्‍याचबरोबर सामाजिक आणि राजकीय लढ्यातील ते सर्वश्रेष्‍ठ सेनापतीही होते. डॉ.आंबेडकरांचा जसा अपमान झाला. तसा पूर्वी अनेक वेळी अनेकांचा झाला होता. आजही होत आहे. परंतु, आंबेडकर एक पैदा झाले. त्‍या अपमानातून आत्‍मभान आलेल्‍या डॉ.आंबेडकरांनी दैदीप्‍यमान कार्यकर्तृत्‍वाद्वारे (जादूच्‍या कांडीने नव्‍हे) कोट्यावधी अस्‍पृश्‍यांचा उध्‍दार केला. `वंचितसमाजाचा लढा कसा लढवावा याचा सर्वोत्‍तम आदर्श समोर ठेवला. शुद्र (ओबीसी), आदिवासी (Tribes) यांच्‍यासाठी वा कोणाही `वंचित' समाजघटकांसाठी हा लढा सर्वोत्‍तम आदर्श ठरतो, परंतु, दलितांसह ओबीसी - आदिवासींना हा आदर्श पेलवता आला नाही, असे दुर्दैवाने म्‍हणावे लागते. पहिल्‍या किंवा दुस-या जागतिक महायुध्‍दापेक्षा मोठे युध्‍द डॉ. आंबेडकर भारतातील ब्राह्मणवादी, भांडवलशाही आणि सरंजामवादी व्‍यवस्‍थ्‍ेविरुध्‍द लढले किंबहुना त्‍यांना मागेही सारले. भारताच्‍या इतिहासात गैातम बुध्‍द आणि सम्राट अशोकांनंतर एवढे मोठे सामाजिक युध्‍द कोणी लढले नाही. पशुतुल्‍य अस्‍पृश्‍यांना `माणसा'चे अधिकार मिळवून देणे हा तर एक चमत्‍कार होता. त्‍यामुळे डॉ.आंबेडकर दलितांचे देव बनले तर त्‍यात नवल नाही. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि बौध्‍द धम्‍म मतामुळे हिंदू मानसिकतेच्‍या `देवत्‍वाचे' स्‍वरुप आलेले नसले तरी डॉ. आंबेडकरांना `महामानव' मानले जावू लागले.

व्‍यक्‍तीपूजेतून ब्राह्मणवादाला बळकटी मिळते, असे सांगणा-या डॉ.आंबेडकरांना `माणूस' म्‍हणून कोणाच्‍याही कार्याचे मूल्यमापन केले जावे, असे अभिप्रेत होते. माणूस मोठा नसतो. येथून तेथून माणूस सारखाचा असतो. कामाने माणूस मोठा-छोटा ओळखला जातो, असे डॉ.आंबेडकरांचे म्‍हणणे होते. डॉ.आंबेडकरांचे कार्य मोठे होते म्हणुन ते म्‍हणून मोठे ठरतात. कार्याने कोणीही मोठे होऊ शकतो, हेच बुध्‍दांचे आणि आंबेडकरांचेही मुख्‍य तत्‍वज्ञान होते. या अनुषंगातून कोणत्याही माणसाचे, मोठ्या मानल्या गेलेल्‍या माणसाचेही `जीवन आणि चरित्राचे' मूल्‍यमापन व्‍हावे, त्‍यामधून आपला जीवन मार्ग ठरवावा आणि चालवावा हेच आंबेडकर या कार्यकर्तृत्‍वाने महान बनलेल्‍या महामानवाला अभिप्रेत होते. म्‍हणूनच डॉ.आंबेडकर म्‍हणतात, माझ्या नावाचा जयजयकार करण्‍यापेक्षा मला अभिप्रेत असलेले कार्य करा. छत्रपति शिवाजी महाराज असो, डॉ.बाबासाहेब आंबेडकर असो वा राजमाता अहिल्‍याबाई होळकर असो. त्‍यांच्‍या अनुयायी वारसदारांनी काय केले? उपरोक्‍त महापुरुषांनी पेरले होते, वाढविले होते, आम्‍हां वारसदारांना, अनुयायांना ते नीट सांभाळून ठेवता आले नाही. किबंहुना या महापुरुषानी जे काय मिळवले ते टिकविताही आले नाही, असेच दिसते. यावर गांभीर्याने विचार करुन, त्‍यानुसार कार्य करण्‍याची गरज आहे. पण असे का घडले ? फुले आणि फुलेवाद दोन्‍ही विसरले गेले, परंतु डॉ.आंबेडकर विस्‍मृतीत गेले नाहीत किंबहुना त्‍यांचा नावाचा भारतभरात-जगभरात जयजयकार (अरुण शौरीसारखे कावळे काही ओरडले तरी) होत आहे. परंतु आम्‍हां वारसदार आणि अनुयायांचे काय? आरक्षण नावाचे साधन वा शस्‍त्र जपण्‍यासाठीच दलित- ओबिसी-आदिवासी चळवळीची 99 टक्‍के दमछाक होत आहे. उरलेले 1 टक्‍के सांस्‍कृतिक आणि धार्मिक कार्यात गुंतलेले आहेत.

मी नेहमी ' सत्‍तेची - राजकारणाची भाषा करतो, मुंबई- दिल्‍लीची भाषा करतो ` याबद्दल काहींचा कटाक्ष असतो. काही टीकाही करतात. 10 वर्षापूर्वी पंचायत समितीत माणूस नाही आणि जानकर पार्लमेंटची भाषा करतात, अशी उपहासाने म्हंटले जात असे. परंतु, मी माझे ध्‍येय - लक्ष्‍य उच्‍च ठेवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्‍हणत, Low aim is crime. छोटे ध्‍येय गुन्‍हा आहे. माझे ध्‍येय आणि लक्ष्‍य प्राप्‍त होईल, यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. गावचे राजकारण करावयाचे असेल तर तालुक्‍याचे राजकारण कळले पाहीजे. तालुक्‍याचे राजकारण करावयाचे असेल तर जिल्‍ह्याचे राजकारण कळले पाहीजे, हे समजून मी `संसदभवन ' लक्ष्‍य केले आहे. सर्व समस्‍या सोडविणारी `गुरुकिल्‍ली' पंतप्रधानांच्‍या हाती आहे. ही गुरुकिल्‍ली सहजासहजी कोणी सोडणार नाही वा मला प्राप्‍त होणार नाही. याची मला जाणीव आहे. धनशक्‍ती विरुध्‍द मत शक्‍ती असा हा लढा आहे.

Man thinks is Biological thing but what he thinks is sociological thing असे डॉ.आंबेडकरांनी नमूद केलेले आहे. सामाजिक संस्कार - शिक्षण यातून माणूस-समाज घडतो-बनतो, असे डॉ.आंबेडकर यांना येथे अभिप्रेत आहे. Issue, Non-Issue and Anti Issue यामुळे समाज/व्‍यक्‍ती प्रभावित झालेली असते. राष्‍ट्रीय समाजाला जाणीवपूर्वक Anti Issues आणि Non Issues मध्‍ये अडकवले गेले आहे. राष्‍ट्रीय समाजाचे Issues नेमके कोणते, हा माझा चिंतेचा / चिंतनाचा विषय आहे. गेल्या काही वर्षाच्‍या अनुभवातून मी शिकलो आहे, धडे घेतले आहेत. अनेक ज्‍येष्‍ठांमुळे मला मार्गदर्शनही मिळाले आहे. यातून मी काही आडाखे बांधले, निर्णय घेतले आणि राष्‍ट्रीय समाज पक्षाची स्‍थापना करुन दिल्‍लीची सत्‍ता माझे मुख्‍य लक्ष बनविले. याबद्दल माझी टवाळीही करण्‍यात आली. परंतु गेल्‍या 5 वर्षात राष्‍ट्रीय समाज पक्ष हा वाढणारा वर्धिष्‍णू पक्ष आहे. हे मी सिध्‍द करुन दाखविले आहे. येत्‍या लोकसभा - विधानसभा निवडणूकीत रासपा महाराष्‍ट्रातील एक प्रभावी शक्‍ती म्‍हणून पुढे येणार, यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. बहुजनांच्‍या चळवळी समस्‍या प्रधान बनल्‍या. त्‍यामुळे त्‍या वळवळ ठरल्‍या. राजकीय पक्षही समस्‍या प्रधानच राहीले. सर्व समस्‍यांची सोडवणूक राजकीय सत्‍तेच्‍या किल्‍लीत आहे, हे अनेक वर्ष यांनी जाणलेच नाही. राजकीय हक्‍क-अधिकराची जाणीव नसल्‍याने असे घडले. त्‍यामुळे बहुमतवाला राष्‍ट्रीय समाज राजा समाज न बनता `प्रज्ञा समाज' बनून राहीला. पोटार्थी शिक्षण घेतले, परंतु सन्‍मानार्थी शिक्षणाची चव त्‍याला मिळाली नाही. आताच्‍या शिक्षणामुळे पोटाचाही प्रश्‍न सुटत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. शिक्षणाबरोबर रोजगाराची संधि उपलब्‍ध करुन देणे हे सरकारचे मुख्‍य कर्तव्‍य आहे. परं‍तु, शिक्षण क्षेत्राचा आता व्‍यापार झाला आहे. राष्‍ट्रीय समाजविरोधी लोकांची सत्‍ता (power) मुंबई आणि दिल्‍लीत असल्‍याने असे घडत आहे. राष्‍ट्रीय समाजाच्‍या हाती सत्‍ता घेणे यातच आपल्‍या सर्व समस्‍यांचे खरे उत्‍तर आहे. म्‍हणून मी Only Power Matters केवळ सत्‍ता असे म्‍हणत असतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्‍हणतात, `'यापुढे हिंदुस्‍थानात जो लढा चालू राहणार आहे, तो ब्रिटीश लोक व हिंदुस्‍थानातील लोक यांच्‍यात राहणार नसून, हिंदुस्‍थानातील पुढारलेले लोक व मागासलेले लोक यांच्‍यात राहणार आहे. तुम्‍ही कदाचित असे म्‍हणाल की, मागासलेला वर्ग बहुसंख्‍याक आहे म्‍हणून त्‍यास पुढारलेल्‍या अल्‍प वर्गापासून भीती बाळगण्‍याचे कारण नाही, परंतु तुम्‍ही लक्षात ठेवले पाहीजे की, एखादा समाज बहुजन समाज आहे एवढ्यावरुन चालणार नाही, तर तो जागृत सुरक्षित, स्‍वाभिमानी असेल तर त्‍याचे सामर्थ्‍य वाढेल, नाही तर गिरणीच्‍या मालकाने किंवा एखाद्या श्रीमंत सावकाराने तुम्‍हांला लाचलुचपत दाखविली व त्‍यासाठी तुम्‍ही आपली मते त्‍यांना विकली तर तुमच्‍या समाजाचे वैशिष्‍्टय नष्‍ट झाल्‍याशिवाय राहणार नाही. आपल्‍या वर्गातील माणसांशिवाय भाडोत्री माणसे/नेते तुमच्‍या समाजाचे कवडीचे देखील कल्‍याण करु शकणार नाही.`'

जगाचा इतिहास पाहता ज्‍या जमातीत `राजकीय जागरुकाता ' (Political Awareness) आहे. त्‍याच जमातींनी राजकीय सत्‍ता (Political Power) मिळविली आणि राजकीय सत्‍तेद्वारे आपल्‍या `समुदायाची' सर्वांगिण-सर्वगामी `प्रगति ' साधली, हे ठळकपणे लक्षात येते. राजकीय जागरुकता असलेल्‍या जमातींनी ज्ञानक्षेत्रात, अर्थक्षेत्रात, सांस्‍कृतिक क्षेत्रात आपले `प्रबळ' स्‍थान निर्माण केल्‍याचे दिसते. आंतरराष्‍ट्रीय पातळीवर `ज्‍यू' आणि देशपातळीवर `ब्राह्मण' यांचे उदाहरण आपण नजरेसमोर ठेवू शकतो. या पार्श्‍वभूमीवर `राजकीय जाण' ` (Political sense)' नसणा-या अनेक आदीम जाती-जमाती अगदी नामशेष झाल्‍याचा जागतिक इतिहास आहे. सामाजिक की राजकीय `परिवर्तन' हा विषय घेऊन आगरकर-टिळक द्वयांनी ब्राह्मण समाजात जी राजकीय जागरुकता निर्माण केली त्‍यामुळेच ब्राह्मण भारताचा `शासनकर्ता वर्ग' `(Ruling Class) बनला. (शासनकर्ता वर्ग आणि राज्‍यकर्ता वर्ग या दोन वेगळ्या संकल्‍पना आहेत) हा इतिहास आहे. या पार्श्‍वभूमीवर धनगर, कोळी, मातंग, मुसलिम समाजात राजकीय जागरुकतेचा अभाव असल्‍याने हे समाज सर्व क्षेत्रातून होत मागास बनल्या. तेव्‍हा आपल्‍या मागासपणाबद्दल केवळ ब्राह्मणांना कारणीभूत ठरवणे चूक ठरेल. तुलनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलित समाजात `राजकीय जाण' (Political sense) आहे. हे मात्र कोणाला नाकारता येणार नाही. परंतु त्याचे रुपांतर राजकीय सत्तेत (Political Power) मात्र करता आले नाही.

महात्‍मा फुले हे ज्ञानांची कवाडे बहुजनांसाठी उघडणारे ज्ञानेश्‍वर आहेत. हे अनेकांना माहित आहे. परंतु, 'सत्‍तेवाचून सकळ कळा, झाल्‍या अवकळा ` असा इशारा ही महात्‍मा फुले यांनीच दिला होता. याचा मात्र विसर पडला. इंग्रज भारतात व्‍यापारासाठी आले, परंतु, शेवटी राज्‍य करुन गेले. मोगल असो वा इंग्रज राज्‍य करुन त्‍यांनी भारतला लुटले. आजही त्‍यांचेच वारसदार भारतावर राज्‍य करीत आहेत. बहुजन नेते मांडलिक / सुभेदार बनून कु-हाडीचा दांडा बनुन गोतास काळ बनले आहेत. (यातुनच शेतकरी आत्महत्या करत आहेत) या सत्‍तेला सत्‍याची जोड देण्‍यासाठी महात्‍मा फुले यांनी सत्‍यशोधक समाज उभा करण्‍याचा प्रयत्‍न केला. महात्‍मा फुले यांचे तथाकथित अनुयायी / वारसदार सत्‍य सोडून केवळ सत्‍ताशोधक बनले, यातून हा घोटाळा झाला.

कु-हाडीचा दांडा बनण्‍यात ओबीसी अग्रेसर आहेत. आपले आदर्श कोणते, आपला विचार कोणता, आपला नेता कोण, आपली संघटना/पक्ष कोणता हे न ओळखता आल्‍यामुळे ओबीसी दिशाहीन होऊन कोणत्‍याही औरंगजेबाचा सरदार बनण्‍यात धन्‍यता मानू लागला. भारताच्‍या, महाराष्‍ट्राच्‍या इतिहासात स्‍वाभिमानावर, स्‍वबळावर छत्रपति शिवाजी महाराज हा एकमेव राजा बनला, बाकी सर्व पगारी सरदार होते. ब्रिटीशांच्‍या अखत्‍यारित राहून देखील जी स्‍वतंत्र प्रज्ञा छत्रपती शाहू महाराजांनी दाखविली. बहुजन हिताचे जे निर्णय घेतले. त्‍याला भारताच्‍या इतिहासात तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या भव्‍य वारशाला कलंकही परकीयांच्‍या दरबारातील पगारी सरदारांनी लावला होता. यातून छत्रपती संभाजी महाराजही वाचू शकले नाहीत. आजही शिवाजी-शाहू यांचे नाव घेऊन उलटा प्रवास करणारे अनेकजण सरदारक्‍या करीत आहेत. लाल-पिवळ्या गाड्यातून मिरवत आहेत. कॉंग्रेस-भाजपा हे देशातील मुख्य प्रतिगामी पक्ष आहेत. फक्त तोंडवळा वेगळा आहे. राष्‍ट्रवादी - शिवसेना हे त्‍यांचेच बगलबच्चे पक्ष आहेत. हे समजुन घेण्याची गरज आहे. त्य अनुषंगाने दलित-बहुजनवादी पक्षानी वाटचाल केली पाहीजे. या देशात सेकयुलर कोण आहे? सेक्युलरवादाचे राज-कारण करुन कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी सत्तेची पोळी खात आहेत. या पार्श्वभुमीवर कधी-कधी महाराष्‍ट्रातील दलित-बहुजनवादी पक्ष यांना राजकीय पक्ष का म्‍हणावे ? असा मला प्रश्‍न पडतो. देशात 52 टक्‍के ओबीसी आहेत, 10 टक्‍के आदिवासी आहेत, 11 टक्‍के मुस्लीम आहेत. हे तीन समाज राजकीय दृष्‍ट्या तसे अडाणी आहेत. या तीनही समाजाला राजकीयदृष्‍टया जागृत केल्‍यास दलीत-बहुजन राष्ट्रीय समाजात विश्‍वास निर्माण होऊ शकतो, यावर माझा पुर्ण विश्वास आहे. अशा प्रकारच्‍या ऑपरेशनमुळेच राष्‍ट्रीय समाज सत्‍ताधारी बनू शकतो यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. त्‍यामुळेच राष्‍ट्रीय समाज पक्षाने खास करुन ओबीसी, मुस्लिम, आदिवासी यांच्‍यामध्ये राजकीय जागृतीचे कार्यक्रम, विशेष अग्रक्रम देऊन राबविण्‍याचा संकल्‍प केला आहे. रिडालोस एक पावरफुल संकल्पना आहे, सत्तेकडे घेवुन जाणारी संकल्पना आहे. त्याला अग्रक्रम देऊन राबविण्‍याचा संकल्‍प ही आम्ही केला आहे. शाहु-फुले-आंबेडकर यांनी मार्ग दिला आहे. त्या दिशेने वाटचाल करणे ध्येय्याप्रत घेवुन जाणे, हेच आम्हा अनुयायी - वारसदाराचे कर्तव्य आहे. तरी या निकषावर आपण अनुयायी-वारसदार ठरतो का याचे मुल्यमापन सर्व समाजाने करणे आणि त्यानुसार मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे सर्वाना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा !

- महादेव जानकर

राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

2 comments:

  1. जानकर साहेबांचा विजय असो येऊन येऊन येणार कोण जानकर साहेबांशिवाय आहेच कोण

    ReplyDelete
  2. Salaam ... Salaam.....Salaam ......
    Jankar sahebanchya, vicharana,Buddhila,Sahanshaktila,tyagala, Niswarthipanala,Mansik kankhartela, Ichchashaktila,Netrutvakshamatela Salaam... Salaam...Salaam.

    ReplyDelete